कर्नाटकमध्ये आजपासून सिद्धरमय्या शासन! नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या घेणार आज शपथ
कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे सिद्धरामय्या हे कुरुबा समाजातील असून उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे आहेत.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचीही नावे समोर आली आहेत. ज्यामध्ये जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांक खरगे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान हे मुख्यमंत्री सोबत मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी
काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकीचे प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिले जात आहे.