ठाकरेंना जय महाराष्ट्र केलेल्या शुभा राऊळ आशिष शेलारांच्या भेटीला; भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई :आगामी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी मतदानाआधी राजीनामा दिल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची माहिती समोर दिली. मात्र राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत शुभा राऊळ?

शुभा राऊळ ३३ महिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होत्या. महाराष्ट्र सरकारच्या कोविड-१९ आयुष टास्क फोर्सच्या सदस्या होत्या. १० मार्च २००७ रोजी त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. मुंबईच्या तिसऱ्या महिला महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. दहिसर भागाचे प्रतिनिधित्व राऊळ यांनी केले. ठाकरे गटाच्या त्या नेत्या होत्या.

दरम्यान शुभा राऊळ यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. मुंबईतील जवळपास ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंना सोडून शिंदेसेना-भाजपत प्रवेश केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर थेट माजी महापौर राऊळ यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
