मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींचा दंड! पालिकेकडून कारवाईचा धडाका…

मुंबई : मुंबई महापालिकेने मराठी पाट्यांविषयी पुन्हा कडक भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेने 3 हजार 133 दुकाने, आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल १ कोटी ९८ लाखांचा दंड वसूल केला आहे.
शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसेच न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. मुंबईत नऊ लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत आणि ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही दुकानदार अजूनही नियम तोडत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड आणि न्यायालयीन कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व २०२२ च्या सुधारणा अधिनियमनुसार, प्रत्येक आस्थापनावर मराठी पाटी लावणे आवश्यक आहे. या पाटीवर वापरलेली भाषा देवनागरी लिपीतील आणि ठळक असावी, हे स्पष्ट नमूद आहे. मात्र, मुंबईतील बऱ्याच ठिकाणी अजूनही इंग्रजी पाट्याच प्राधान्याने लावलेल्या दिसत आहेत.
नियम मोडणाऱ्यांना दरदिवशी प्रति कर्मचारी दोन हजार रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईचा सामना करावा लागू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये संबंधितांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे आता उच्च न्यायालयात हजेरी लावणे भाग पडत आहे.
दरम्यान, पालिकेने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ६० निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दररोज २ ते ३ हजार दुकाने तपासण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. मराठी पाटी नसलेल्या दुकानांचे फोटो घेतले जात असून, त्यावरूनच नोटिसा पाठवल्या जात आहेत.