पुण्यात गोळीबाराचा थरार ; ‘तु तिला घरी का सोडलसं ‘? विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद, पोलिसांकडून चौकशी सुरू…

पुणे : पुण्यातील मावळ परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत तीन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. या प्रकारानंतर आता नेमका हा गोळीबार कोणी आणि का केला याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते यांचा चुलत भाऊ वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत आहे. त्याने आरोपींच्या ओळखीतील एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडले होते. याच कारणावरून आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी त्याला शाळेबाहेरून स्कॉर्पिओमध्ये बसवून मारहाण केली. त्यानंतर आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.हा वाद इतका टोकाला गेला की,सौरभ वाघमारे याने पिस्तूल काढून अक्षय मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडली, मात्र ती फायर झाली नाही. राऊंड खाली पडला. त्यानंतर अक्षय व त्याचे मित्र पळू लागले असता आरोपीने पुन्हा गोळी झाडली . सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अक्षय जवळच्या सोसायटीत पळून गेल्याने त्याचा जीव वाचला.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तात्काळ पथके तयार करून छापा टाकत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एक आरोपी अद्याप फरार असून, वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

