धक्कादायक! फलटणमध्ये आयुर्वेदिक काढ्याने विषबाधा? बाप लेकाचा झाला मृत्यू..
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिता, पुत्राने रात्री जेवणानंतर आयुर्वेदिक काढा पिल्यानंतर त्यांना झोपेत अचानक त्रास सुरू झाला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काहीवेळाने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या पिता, पुत्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, त्यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे आयुर्वेदिक काढा घेतला. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र मध्यरात्री अचानक हणमंतराव त्यांचा मुलगा अमित आणि त्यांच्या मुलीला त्रास जाणवू लागला.
यावेळी लागलीच त्या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या पितापुत्राचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दरम्यान, हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर या पितापुत्रांचा अश्या प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हेही अजून समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.