धक्कादायक! तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा खून, इंदापूर पोलिसांकडून पतीसह मित्राला अटक….

इंदापूर : येथील कळाशी येथून तीन महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेचा पती आणि त्याच्या मित्राने खून केल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून करून मृतदेह ढेकुगाव ते परधाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक) घाटात टाकण्यात आला. २९ जानेवारी २०२५ रोजी प्रियंका करे ही बेपत्ता झाल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
इंदापूर पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर २३ एप्रिल २०२५ रोजी हवालदार सुधीर भीमराव काळे यांनी फिर्याद दिली. प्रियंका जोतीराम करे (वय २६, रा. कळाशी, ता. इंदापूर) असे दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. प्रियंकाचे लग्न जोतीराम याच्या सोबत झाले होते.
जोतीराम हा सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझे वागणे बरोबर नाही. त्यामुळे आमची नातेवाईक व जनमानसात बदनामी होत आहे, असे म्हणून छळ करायचा. अशी माहिती आहे. यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होत होता.
जोतीराम आबा करे (वय ३४, रा. कळाशी ता. इंदापूर), दत्तात्रय शिवाजी गोलांडे (रा.गोलांडेवस्ती, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यातील वाद हा पुढे वाढतच गेला. त्यानंतर जोतीरामने तिचा खून करण्याचे ठरविले. २७ जानेवारी २०२५ रोजी आरोपी जोतीराम करेने गळा दाबून प्रियंकाचा खून केला.
यानंतर त्याने त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे याला बोलवून घेतले. या दोघांनी तिचे प्रेत चार चाकी वाहनात टाकून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकुगाव ते परधाडी घाटात फेकून देऊन पुरावा नष्ट केला. नंतर ती बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले.