पुण्यातील सोमवार पेठेत भरदिवसा घरात घुसून धक्कादायक कांड, महिला हादरली, नेमकं काय घडलं?

पुणे : खडीचे मैदान जवळील एका सोसायटीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ३ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. पुणे शहरातील गजबजलेल्या सोमवार पेठ परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धाडसी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवार पेठेतील एका सोसायटीत राहणाऱ्या महिला मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या फ्लॅटला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. भरवस्तीत घर असल्याने आणि वर्दळ असल्याने त्यांना चोरीची शंकाही आली नाही. मात्र, दुपारी पाऊणे तीन वाजता त्या घरी परतल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
घरात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी कपाट फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत लंपास केला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेने तात्काळ समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. गजबजलेल्या भागात आणि ते ही दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
