नराधम किर्तनकाराचा धक्कादायक कांड! अल्पवयीन मुलीसोबत ५ वर्ष केले शारीरिक छळ, घटनेने राज्यात खळबळ

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका कीर्तनकार महाराजाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

एका ३८ वर्षीय कीर्तनकाराने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तब्बल पाच वर्षे गंभीर लैंगिक शोषण केले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त ग्रामस्थांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.
आरोपी मागील पाच वर्षांपासून पीडितेचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी तिला सातत्याने धमकावत होता. घरी कुणी नसताना संधी साधून तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर तिच्या भावाने विश्वासात घेत याबाबत विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज असं आरोपीचं नाव आहे. तो श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. मागील पाच वर्षांपासून तो १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धाक दाखवून अत्याचार करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असताना आरोपीनं तिच्यावर वाईट नजर ठेवून संधी साधली. तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तो मुलीला गप्प बसवत होता. १० मार्च रोजी आरोपीने मुलीला घरी बोलावून मारहाण करत गरम लोखंडी पक्कडीने चटके देत पुन्हा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.
पीडिता आठवीत असल्यापासून, म्हणजेच २०२१ पासून हा ३८ वर्षीय नराधम तिच्यावर अनन्वित अत्याचार करत होता. आरोपी आणि पीडितेचे कुटुंब शेजारीच राहत असल्यामुळे त्यांच्यात चांगले घरोब्याचे संबंध होते. मुलीचा सख्खा भाऊ याच आरोपीच्या संस्थेमध्ये सचिव पदावर काम करतो. या ओळखीचा गैरफायदा घेत, मुलगी किंवा स्वतःच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर वारंवार बळजबरी केली.
जेव्हा या अल्पवयीन मुलीने त्याच्या या घृणास्पद कृत्याला विरोध दर्शवला, तेव्हा या बाबाने तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची थेट धमकी दिली. आपण यापूर्वीच ‘दोन हाफ मर्डर’ केले असून, याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास आई-वडील आणि भावाला जिवे मारू, अशी दहशत त्याने निर्माण केली होती. कुटुंबाच्या जिवाच्या भीतीने या कोवळ्या जीवाने आपला हा शारीरिक छळ अनेक वर्षे मुकाट्याने सहन केला.
घटनेच्या दिवशी १० मार्च रोजी आरोपीनं पीडितेला फोन करून घरी भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी पीडित मुलीने आरोपीकडे जाण्यास नकार दिला होता. यामुळे आरोपीचा संताप अनावर झाला. त्याने पीडितेच्या वडिलांना आणि भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली. यावेळी संतापलेल्या आरोपीनं तिला गालावर चापटी आणि अंगावर बांबूने मारहाण केली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. आरोपीनं तिचे अंगावरील सगळे कपडे काढून घेतले आणि किचनमध्ये गेला. त्याने गॅसवर पक्कड गरम करून आणली आणि मुलीच्या गुप्तांगाजवळ दोन्ही मांड्यांना चटके दिले. यावेळी मुलीने विरोध केला असता आरोपीनं तिच्या हातालाही चटके दिले.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणी आपल्या घराजवळ रडत बसली होती. ही बाब भावाने पाहिली, त्याने पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बहिणीसोबत घडणारा प्रकार ऐकून भावाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.