पुण्यातील धक्कादायक प्रकार ; कामावरून काढून टाकल्याच्या रागातून सुपरवायझरच्या मुलीचं अपहरण, अन केलं भयानक कृत्य..

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गँगवॉर, गोळीबार, खून, अपहरण अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. यातच आता पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या विमाननगर परिसरात कामावरून काढून टाकल्याच्या रागातुन दोन कामगाराने आपल्या सुपरव्हायझरच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवशंकर कुमार पासवान (वय २६) यांनी 3 वर्षीय मुलगी कशीश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.त्यानंतर संशयित म्हणून प्रिन्स पॉल (२५) आणि ओमनारायण पासवान (२०, दोघेही रा. लेबर कॅम्प, म्हाडा कॉलनी, विमाननगर, मूळगाव बिहार) यांची नावे पुढे आली. कामावरून काढून टाकल्याचा राग काढण्यासाठीच त्यांनी मुलीचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला. त्या तक्रारीनंतर तात्काळ विमानतळ पोलिसांनी अवघ्या काही तासांत केलेल्या धाडसी कारवाईत तीन वर्षांच्या मुलीची सुटका केली.
दरम्यान तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, एपीआय संतोष शिंदे आणि शिरसाट यांच्या नेतृत्वात दोन विशेष पथके तयार करण्यात आली. लेबर कॅम्प परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधमोहीम सुरू झाली. तपासात आरोपींचे लोकेशन प्रथम तळेगाव दाभाडे, त्यानंतर लोणावळा आणि पुढे रेल्वे मार्गावर आढळले.संयुक्त कारवाईत कल्याण रेल्वे स्थानकावर दोन्ही आरोपींना पकडण्यात आले आणि चिमुकली कशीश हिला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.
