पुण्यात धक्कादायक घटना! ऑर्डर वेळेवर पोहोचली नाही म्हणून आला राग, चौघांचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य..


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

कडाक्याच्या थंडीत आणि रात्रीच्या अंधारात पोट हातावर घेऊन काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याला केवळ ‘ऑर्डर उशिरा आली’ या कारणावरून रक्ताळले जाईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

हा संतापजनक प्रकार आंबेगाव येथील वाघजाई नगरमध्ये ४ फेब्रुवारीच्या रात्री घडला असून, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५) हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रात्री साडेअकराच्या सुमारास ते विकास काशिनाथ धोत्रे याच्या घरी जेवणाची ऑर्डर घेऊन गेले होते. मात्र, काही कारणांमुळे डिलिव्हरीला थोडा उशीर झाला.

याच गोष्टीचा राग मनात धरून विकास धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी जुबेर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी माणुसकीला तिलांजली देत जुबेर यांना लाकडी बांबूने आणि हाताने बेदम मारहाण केली.

जुबेर मदतीसाठी ओरडत असतानाही ही टोळी त्यांना मारत राहिली. सुदैवाने, त्याच वेळी आंबेगाव पोलीस ठाण्याचे मार्शल गस्तीवर होते. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींचे धाबे दणाणले आणि तिघे साथीदार तिथून पसार झाले. पोलिसांनी मुख्य आरोपी विकास धोत्रेला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, जुबेर शेख यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार लोहार पुढील तपास करत आहेत. १०-१५ मिनिटांच्या उशिरासाठी एका कष्टकरी माणसाला अशा प्रकारे मारहाण होणे, हे पुणेकरांच्या सुसंस्कृतपणाला धक्का लावणारे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!