पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना! आढळला मजुराचा, मध्यरात्री अचानक गायब अन्…

पुणे : ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या दरीत आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दशरथ शंकर धोत्रे (मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दशरथ धोत्रे हे चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते.

बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते. त्यांच्या सहकाऱ्यांना ते गावाकडे निघून गेले असावेत, अशी शंका होती. दिवसभर त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांना दरीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
राजगड पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.