धक्कादायक! पुण्यात बनावट IPS माय -लेकींचा चप्पल विक्रेत्याला हजारोचा गंडा, पोलिसांकडून दोघींना अटक

पुणे : पुण्यातील महात्मा गांधी रोड परिसरात दागिने खरेदीच्या बहाण्याने IPS मायलेकींनी एका चप्पल विक्रेत्याला हजारोंचा गंडा घातला आहे.धक्कादायक बाब म्हणजे या दोघीही बनावट आय पी एस अधिकारी असल्याचं उघड झालं आहे. अधिकारी असल्याचे भासवून चप्पल-बूट व दागिने लंपास करणाऱ्या या मायलेकींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, लष्कर पोलिस ठाण्यात एका चप्पलचे व्यावसायिक असलेल्या व्यक्तीने फिर्याद दिली होती. पुण्यातील महात्मा गांधी रोड परिसरात या व्यावसायिकाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी २ महिला या तक्रारदार व्यावसायिकाच्या दुकानात आल्या.त्यांनी आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बूट खरेदी करायला आलो असल्याचे सांगितले आणि संबंधित दुकानातील कामगाराला ‘पैसे घेण्यासाठी कमिशनर ऑफिसला चल’ असा रुबाब केला.मात्र या मायलेकी पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या.

दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या माय लेकींचा शोध घेतला. मूळच्या पुण्यातील कोंढवा भागातील असलेल्या या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या दोघींना काय शिक्षा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

