पुण्यात मुळशी मर्डरचा धक्कादायक प्रकार! लोखंडी वस्तूने मारलं अन् गळा चिरून हत्या, घटनेने खळबळ..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता मुळशी तालुक्यात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. कर्ज फेडण्यासाठी रिक्षाचालकाने प्रवाशाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी सचिन जाधव (वय ४१, रा. धणकवडी) याला अटक केली असून, त्याच्यावर प्रवासी आशुतोष वैशंपायन यांच्या खुनाचा आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर, पुणे येथील रहिवासी आशुतोष वैशंपायन ४ सप्टेंबर रोजी लखनऊहून पुणे स्टेशनवर आले होते. स्टेशनहून रिक्षाने ते सुभाषनगर येथे गेले आणि तिथे एका बारमध्ये मद्यपान केले. त्यानंतर दुसरी रिक्षा पकडून ते निघाले, मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, रिक्षाचालक सचिन जाधव याने वैशंपायन यांच्या जवळ मोठी रोकड असल्याचे पाहिले होते. पैशाच्या लालसेपोटी त्याने खुनाचा कट रचला. 11 सप्टेंबर रोजी जाधवने वैशंपायन यांना मुळशी तालुक्यातील घोटवडे गावाजवळ नेले. तिथे त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि नंतर गळा चिरून त्यांचा खून केला. मृतदेह गावात टाकून तो फरार झाला.
इतकंच नव्हे तर, खून केल्यानंतर जाधवने वैशंपायन यांचे डेबिट कार्ड वापरून ४.४५ लाख रुपये काढले. हे पैसे त्याने स्वतःच्या मिनी-ट्रकवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले. ११ सप्टेंबर रोजी घोटवडे गावात मध्यमवयीन व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आधार कार्डावरील पत्ता मुंबईतील पवईचा होता, मात्र चौकशीत वैशंपायन यांचे कुटुंब पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पुणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे रिक्षाचालक सचिन जाधवपर्यंत पोहोचले. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी सापळा रचला आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
विशेष म्हणजे, आरोपी जाधव याच्यावर यापूर्वीच १३ दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांना त्याचा गुन्हेगारी स्वभावाची कल्पना होती. न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या रिक्षाचालकाने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
