शिंदवणे घाटात अपघाताचा थरार! भरधाव वेगाची रिक्षा पलटी होऊन इनोव्हाला धडकली, महिला जागीच ठार..


पुणे : उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात वारंवार अपघाताचे सत्र सुरूच असून आता भरधाव वेगातील रिक्षा पलटी होऊन समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोरदार धडकली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षातील एका 85 वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,मंगळवारी (ता. 24) सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) गावाच्या हद्दीत घाटातील तीव्र वळणावर एक रिक्षा वेगमर्यादा न पाळता निष्काळजीपणे वेगाने जात होती.वळणावर नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली व समोरून येणाऱ्या इनोव्हा या गाडीला धडक बसली. या धडकेत रिक्षात बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

यमुना साहेबराव जगताप (वय 85, रा. राजेवाडी ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर विजय साहेबराव जगताप (वय 52, रा, राजेवाडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सलमान रहीस तांबोळी (वय 27, धंदा चालक रा. नंददीप कॉलनी नडेनगर काळेवाडी पिंपरी चिंचवड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच तात्काळ कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे, माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्यांना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या अपघातात यमुना जगताप यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

शिंदवणे घाटात झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून इतरांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत. या प्रकरणी सलमान तांबोळी यांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!