धक्कादायक! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक…

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना समोर येत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. हितेश रमेश संघवी नावाच्या व्यक्तीने एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा भासवत फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी या दांपत्याने 18 ते 20 जणांना रेल्वेत नोकरी, म्हाडाचे फ्लॅट आणि इतर कामांचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे समोर आले आहे. स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवत त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. तसेच शिंदे यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि अपॉइंटमेंट लेटरचा सर्रास वापर केला. नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने अनेक गरजू नागरिकांना सरकारी नोकरी आणि कमी दरात घरांचे स्वप्न दाखवले. फसवणुकीचे व्यवहार हर्षल शालिग्राम बारी यांच्या कालिंका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये झाले. हर्षल बारी यांच्याकडून एकट्याकडून 13 लाख 37 हजार रुपये तर इतर पीडितांकडून 42 लाख 22 हजार रुपये उकळण्यात आले.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगावच्या शनिपेठ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
