पुण्यात ठाकरे गटाला धक्का ; बडा नेता अजित पवारांसोबत जाणार? राजकीय वर्तुळात खळबळ….

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सत्ताधारीत महातुतीत पक्षप्रवेश करत आहेत.अशातच पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमधील बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महापालिका निवडणुकाआधी पिंपरी चिंचवडमधील बालेकिल्ला काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अशातच वाघेरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आहेत. याच प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे अजित दादांना भेटणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामुळे संजोग वाघेरे मशाल सोडून अजित पवार गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान याआधी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘मी मुळात शिवसेनेत असलो तरी, माझी पत्नी आजही राष्ट्रवादीतच आहे. मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात’, असं म्हटले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी संजोग वाघेरे यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जर या चर्चा खऱ्या ठरल्या तर, पिंपरी चिंचवडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला जोरदार धक्का बसणार आहे.
