मनसेंला धक्का! राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार फुटणार,’ या’ नेत्याने घेतली एकनाथ शिंदेचीं भेट,

पुणे :राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. येत्या १५ जानेवारीला मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच आता मनसेला मोठा धक्का बसला आहे.माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ते लवकरच शिवसेनेत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युती केली असली तरी युतीच्या घोषणेनंतर मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम केला होता. मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. याच कारणामुळे आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.यानंतर आता त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावरुन ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश महाजन कोण?

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रकाश महाजन यांचा राजकीय प्रवास अत्यंत चढ-उतारांचा राहिला आहे. मराठवाड्यातील विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिथे त्यांनी संघटक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
काही काळानंतर प्रकाश महाजन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रवक्ते म्हणूनही काम पाहिले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा मनसेत परतले होते. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रकाश महाजन यांनी पुन्हा एकदा मनसेला रामराम ठोकला. त्यांनी नारायण राणे यांच्याकडून मिळत असलेल्या धमक्यांचे कारण देत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
