Shivsena : राजकारणातील मोठी बातमी! ३१ डिसेंबरपूर्वीच होणार आमदारांचा निर्णय, अपात्रतेबाबत घडामोडींना वेग..

Shivsena : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. Shivsena

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरळ विधानसभा अध्यक्षांना दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय याच वर्षी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय नवीन वर्षांत होणार आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोणतीही घडामोड गेल्या सहा महिन्यांत घडलेली नाही. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत असल्याचा आरोप सातत्यानं ठाकरे गटाकडून होत आहे.

आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपले मत स्पष्ट केले आहे. गेल्या सुनावणीतही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आम्ही दिलेल्या निर्देशांचे तातडीने पालन करा, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले होते. तसेच, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करा, असंही न्यायालयाने सांगितले होते. यावर राहुल नार्वेकरांनी एक वेळापत्रक तयार केले होते.
पण त्या वेळापत्रकामुळे प्रकरण फार लांबले जात होते. या सुनावणीसाठी पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले होते. परंतु, त्यावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. आज अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक न्यायालयात सादर केले. मात्र, हे वेळापत्रकही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत विधानसभा अध्यक्षांना थेट अल्टिमेटम दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली डेडलाईन पाळली नाहीतर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता याप्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.