Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला? समितीकडून धक्कादायक अहवाल आला समोर..
Shivaji Maharaj : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याने राज्यभर पडसाद उमटले होते. शिवरायांचा पुतळा कसा कोसळला याबाबत आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने राज्या सरकारकडे १६ पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक कारणं समोर आली आहेत.
चुकीच्या वेल्डिंग कामामुळे तसेच गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर पुतळा उभारण्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नसल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. परिणामी पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता ज्यामुळे पुतळा कमकुवत झाला आणि कोसळला.
मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीने हा अहवाल सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ३५ फूट उंच असलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची एकच लाट पसरली होती. वेगवेळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत होत्या. Shivaji Maharaj
या दुर्घटनेबाबत शिंदे सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. पुतळा कोसळण्यामागील नेमकं कारण काय होतं? याची चौकशी समितीने केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही समिती गठीत करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांचा देखील या समितीमध्ये समावेश होता. तसेच आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांचा समावेश सुद्धा या समितीमध्ये होता.