महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ झाली आहे.

शिवसेना शिंदे गटातील एका प्रमुख नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

मोरे हे मंत्री भरत गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यांचा हा पक्षबदल शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुतारवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी खासदार तटकरे यांनी रमेश मोरे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेशानंतर बोलताना रमेश मोरे यांनी आपल्या पूर्वीच्या पक्षावर, शिवसेनेवर काही आरोपही केले आहेत. त्यांच्या या पक्षबदलामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. मात्र, आता महायुतीतील घटक पक्षांमध्येच नेत्यांची अदलाबदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने नाराजी व्यक्त झाली होती. आता राष्ट्रवादीने शिंदे गटाला धक्का दिला आहे.
