पुणे जमीन व्यवहारातील शितल तेजवानी आधीपासूनच घोटाळेबाज ; कर्ज प्रकरणाबाबत धक्कादायक उलगडा…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार गाजत असतानाच पुण्यात दुसरा मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.शीतल आणि तिचे पती सागर सुर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली, यातून तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेतील या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडी कडून अटक झाली होती. शीतलने मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळं शीतलने केवळ जमीन व्यवहार प्रकरणात नव्हे तर कर्ज प्रकरणात ही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमेडिया कंपनीला ही जमीन विकणारी शितल तेजवानी या संपूर्ण व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. हा 40 एकराचा भूखंड बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. पुण्यातील ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी तेजवानी हिने मूळ 272 मालकांना शोधत नाममात्र 10 ते 15 हजार रुपये देऊन करून घेतली होती. त्यामुळे हा व्यवहार करताना शितल तेजवानी हिने अतिशय थंड डोक्याने सगळा प्लॅन आखला होता.

दरम्यान आता या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि द्विग्विजय पाटील या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रविण चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 या दरम्यान हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

