शिरूर–हवेली ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; मतदारसंघ वाहतूक कोंडीमुक्त होण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल, आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश…

शिरूर–हवेली मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राज्य शासनाने मतदारसंघातील प्रमुख वाहतूक प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असून, यामुळे येत्या काही वर्षांत शिरूर–हवेलीच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल होणार आहे.
सन २०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर माऊली आबा कटके यांनी मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येवर, म्हणजेच ‘वाहतूक कोंडी’वर लक्ष केंद्रित केले. पुणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, शिरूर तसेच लोणीकाळभोर,उरुळीकांचन सोलापूर महामार्ग परिसरात दररोज प्रचंड कोंडी होत होती.

यामुळे नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा यासाठी आमदार कटके यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या, संबंधित विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्याकडे त्यांनी या विषयाची गंभीरता मांडत विशेष बैठका घेतल्या. तसेच विधानसभेत लक्षवेधी सूचना आणि निवेदनांच्या माध्यमातून या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
आमदार कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने तसेंच केंद्र शासनाने खालील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे:
१) पुणे ते शिरूर उन्नत मार्ग (Flyover):
औद्योगिक आणि व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतूक सुलभ करण्यासाठी सुमारे ७,३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दररोज हजारो वाहनांची वाहतूक जलद आणि सुरक्षित होईल.

२) सोलापूर रस्ता उन्नत मार्ग (हडपसर ते यवत):
पुणे–सोलापूर महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत या दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ६,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुणे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
३) वाघोली मेट्रो प्रकल्प:
वाघोली व आसपासच्या भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सुमारे ३,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आधुनिक पर्याय उपलब्ध होईल.
४) चाकण – शिक्रापूर उन्नत मार्ग:
औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर उन्नत मार्ग उभारण्यासाठी जवळपास ६,१५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण कामांबरोबरच आमदार कटके यांनी हडपसर ते लोणीकाळभोर या मेट्रो मार्गाचा देखील सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, या मेट्रो मार्गालाही मान्यता मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. यामुळे सोलापूर रस्ते परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सर्व प्रकल्पांची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शिरूर–हवेली मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत बोलताना आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, “मतदारसंघातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
प्रकल्प मंजूर होणे हा पहिला टप्पा असून, काम पूर्ण होईपर्यंत मी सातत्याने पाठपुरावा करत राहणार.” या निर्णयामुळे शिरूर–हवेली मतदारसंघात आनंदाचे वातावरण असून, या विकासकामामांमुळे उद्योग आणि रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे