Shirur : ‘घोडगंगा ‘च्या संचालकांनी नैतिकता स्विकारुन राजीनामे द्यावेत! तालुक्यातील सर्व ऊसाच्या गाळपाची व्यवस्था करणार – आमदार ज्ञानेश्वर कटके स्पष्ट वक्तव्य

Shirur मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने घोडगंगा सहकारी साखर कारखाना ताब्यात दिला होता त्या विश्वासाला तडा गेला असून घोडगंगा सहाकरी साखर कारखान्याच्या संचालकांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असे मत शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केले. शिरूरच्या पूर्व भागामध्ये गाव भेट दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिरूर हवेलीच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने विश्वास दाखवून मला निवडून दिले. शिरूर तालुक्यात कधी नव्हे एवढे स्वागत सर्वत्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून घोडगंगा सहाकरी साखर कारखाना निवडून देताना सभासदांनी मोठा विश्वास दाखवला होता त्यास तडा गेला आहे.
त्यामुळे संचालकांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. या भागातील शेतकऱ्यांचा ऊस तोडीसाठी संघर्ष सध्या सुरू असला तरी कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. लवकरच सर्व कारखान्याच्या प्रशासनाची मी स्वतः मीटिंग करणार असून कुणाचेही टिपरू रानात राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. Shirur

शिरूर तालुक्याच्या अनेक भागात रस्ते पाणी, वीज तसेच विविध प्रकारच्या समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहे. तसेच ट्रांसफार्मर, चासकमानचे पाणी आदींबाबतही योग्य ती काळजी घेतली जाईल.कोणत्याही गावाला निधी कमी पडू देणार सर्वांना समान निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.जेथे आवश्यकता असेल तेथे पूल बांधले जाणार आहेत. जनतेने ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही असे माऊली कटके यांनी सांगितले.
शिरूर च्या पूर्व भागातील नागरगाव आंधळगाव, सादलगाव ,बाभूळसर बुद्रुक, तांदळी, गणेगाव दुमाला, मांडवगण फराटा आदी गावात आभार दौऱ्याच्या निमित्ताने कटके हे आले असतानाच अनेक ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना घोडगंगा सहाकरी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार म्हणाले की शिरूर तालुक्यात चालू वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस आहे. परंतु उसाच्या टोळ्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जात नाही. ऊस वेळेवर तोडावे यासाठी अनेक शेतकरी कारखान्यावरती हेलपाटे मारावे लागते. गेले दोन वर्षांपासून घोडगंगा कारखाना सुरू होऊ शकला नाही ज्यांनी केवळ आश्वासने दिले ते आश्वासन पाळू शकले नाहीत
ऊस तुटत नाही यात प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
त्यामुळे संचालकांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी सुधीर फराटे इनामदार यांनी केली. या वेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाडिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, घोडगंगेचे संचालक दादा पाटील फराटे,महेश ढमढरे, सुधीर फराटे इनामदार, सुजित शेलार, स्वप्निल ढमढेरे, स्वप्निल गायकवाड,रामभाऊ कदम, सुनील चाचा जाधवराव, शरद साठे, एकनाथ शेलार,सरपंच उज्वला शेलार, अविनाश पवार, दिपाली नागवडे, तुकाराम निंबाळकर, समीक्षा फराटे पाटील, राजेंद्र गदादे, रायबा बोरकर, सागर फराटे, सचिन मचाले, सुभाष शेलार, आदी उपस्थित होते. तसेच सर्व गावचे सरपंच,ग्रामस्थ,युवक,महिला,भाजपा, शिवसेना व महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.