Shirur : कौतुकास्पद! पाच मुलं शेततळ्यात बुडत होती, शिरूरच्या इनामगावच्या उपसरपंचांनी बघितल अन् वाचवला पाच मुलांचे जीव…
Shirur : इनामगाव ( ता शिरूर ) येथील शेततळ्यात बुडणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांचे प्राण उपसरपंच सूरज मचाले यांनी दाखवलेल्या धाडस व तत्परतेने वाचले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. ही घटना शनिवार (ता.१५) रोजी दुपारी घडली होती.
सविस्तर माहिती अशी की, इनामगाव येथील खरात व कांगुणे कुटुंबातील शिवराज मनोहर कांगुने, सक्षम नवनाथ खरात, ओंकार किरण खरात, गौरव किरण खरात, पृथ्वीराज रवींद्र खरात ही मुले शनिवारी (ता. १५) दुपारी चार वाजता गावातील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती.
परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व काही मुलांना पोहता येत नसल्याने मुले पाण्यात बुडू लागली. मुले पाण्यामध्ये बुडू लागल्याने जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा आवाज बोअरवेलची मोटर बंद करण्यासाठी आलेले उपसरपंच सुरज मचाले यांनी ऐकला.
त्यांनी जवळ जाऊन पाहिले की, मुले पाण्यात बुडत आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच शेततळ्यामध्ये उडी मारून जीवाची पर्वा न करता त्या पाचही मुलांना सुखरूप बाहेर काढले. या ठिकाणी काहीही घडू शकत होते मात्र उपसरपंचांचे प्रसंगावधान त्या पाच मुलांच्या जीवासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. Shirur
उपसरपंच सुरज मचाले काय म्हणाले?
इंदापूरला बहिणीला सोडवण्यासाठी चाललो होतो, पण जाताना विद्युत पंप बंद करून पुढे जाणार होतो. विद्युत पंप बंद करत असताना मोठमोठ्याने मुलांचा आवाज येऊ लागला, त्यामुळे मी आवाजाच्या दिशेने जोरात पळत सुटलो.
त्यानंतर समोर पाहतोय, तर काय पाच मुले एकामेकींना धरून शेततळ्यामध्ये पाण्यामध्ये बुडत होती. त्यानंतर मी लगेच शेततळ्यामध्ये उडी मारून त्या पाच मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. नशीब बलवत्तर म्हणून पाचही मुलांना मला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले.