Shirur Crime : शिरूरमध्ये मोठा दरोडा! हल्ल्यात वृद्ध महिला ठार, एक जखमी, घटनेने उडाली खळबळ…

Shirur Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून वृद्ध व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय. ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले. आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. Shirur Crime
यावेळी दरोडे खोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले, दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलांबई या गंभीर जखमी झाल्या. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू आहे.
दरम्याने, ठोंबरे यांच्या आरडा ओरडामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यामुळे दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटणास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सिसिटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.