होळीलाच राजकीय शिमगा, ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा…!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेकदा वादाची ठिणगी पडली आहे. याआधी ठाण्यात आणि कोकणात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट भिडले आहेत. यामुळे होळीदिवशीच परिसरात तणावाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे. ठाण्यातल्या शिवाईनगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान होळीनिमित्त ठाणे जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवाईनगर शाखेवरून दुसऱ्यांदा वाद निर्माण झाला आहे. सोमवारी होळीनिमित्त दोन्ही गटातील शिवसैनिक कार्यालय परिसरात जमले होते. या शाखेत नेमकं कुणी बसायचं? शाखेचा ताबा कुणाकडे आहे? यावरून वाद निर्माण झाला.
शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शाखा ताब्यात घेण्यावरून सर्वाधिक राडा ठाण्यात झाला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना पाहून ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली. गद्दार-गद्दार आणि ५० खोके एकदम ओके म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर वाद वाढत जाऊन प्रकरण हाणामारीपर्यंत आले.
ठाण्यातील बहुतेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत,पण काही नगरसेवक आणि पदाधिकारी अजूनही ठाकरे गटात आहेत, त्यामुळे हा वाद निर्माण होत आहे. टेंभीनाका, शिवाईनगर अशा बऱ्याच ठिकाणी शिवसेना शाखेवरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. घटनास्थळावर मोठा बंदोबस्त तैनातकरण्यात आला आहे.
शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हटले की, ही शाखा शिवसेनेची आहे. ही आमची शाखा आहे. याठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे. ठाकरे गटाचे दोन तीन लोक बसत असत आम्ही त्यांना अडथळा आणला नाही. मात्र आमच्याच घरात बसायला त्यांची परवानगी मागावी लागत होती. त्यांनी अवैध पद्धतीने कार्यालयाला कुलूप ठोकले होते. आम्ही त्यांना किल्ली मागितली मात्र त्यांनी न दिल्याने आम्हाला कुलूप तोडावे लागले.