शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी?, खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायला तयार; कारण…
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपमध्ये तेढ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे च्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे.
डोंबिवलीतील काही नेत्यांकडून शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. आपल्या पदाचा राजीनामाही देण्याची तयारी असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
डोंबिवलीत एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला.
तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, डोंबिवलीतील काही नेते स्वार्थी राजकारणासाठी भाजप-शिंदे गटात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की मला कोणत्याही पदाची इच्छा नाही. भाजप-शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व जो उमेदवार ठरवेल त्याला मी पाठिंबा देईन.
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य मी पाहिले. सोशल मीडियावरही वाचलं. मला वाटतं उमेदवार कोण असेल ते वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल. जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. पण मला एकच सांगायचंय, ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती स्थापन केली. युती झाल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतंय, असं श्रीकांत शिंदे सुरुवातीला म्हणाले.