फक्त ‘सरसकट’ हा शब्द वापरा उद्याच उपोषण सोडतो! शिंदे सरकारने जीआर काढला, पण जरांगे पाटलांनी केली मोठी घोषणा..

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून जालन्याच्या अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल घोषणा केली होती. आज अखेर सरकारने यासंदर्भात शासन आदेश काढलेला आहे.
या निर्णयाचा आज शासकीय जीआरदेखील जारी करण्यात आला. या जीआरची प्रत घेऊन सरकारच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र जरांगे पाटील यांनी या जीआरमध्ये दुरुस्ती सुचवली असून जोपर्यंत ही दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवणार असल्याची घोषणाही केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिल्यानंतर आज मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. तसेच मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.
मात्र जीआरमध्ये केवळ मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना असे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सरसकट या शब्दाचा समावेश शासकीय जीआरमध्ये करण्यात यावा, अशी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान,जरांगे पाटलांच्या नव्या मागणीनंतर अर्जुन खोतकर यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईला येण्याची विनंती केली. मात्र आमच्या वतीने एक शिष्टमंडळ मुंबईला येईल, असे जरांगे पाटलांनी सांगतले आहे.
त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत शासनाकडून जीआर जारी करण्यात आला असला तरी जरांगे पाटलांचे उपोषण या जीआरमध्ये दुरुस्ती होईपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.