प्रियकराला सिलिंडर आणायला लावलं अन् वादाला तोंड फुटलं! पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् पुढे भयानक घडलं…,घटनेने अमरावती हादरली

अमरावती : अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला जिवानिशी ठार करण्यात आलं. पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास खुनाची ही संतापजनक घटना घडली आहे.

अरविंद नजीर सुरत्ने (वय. 37, रा. गरजदरी, ह.मु. पथ्रोट) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी 3 सप्टेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
मृताचा मोठा भाऊ अशोक यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मारेकरी अमित लवकुश मिश्रा (33, रा. पथ्रोट) याच्यासह 38 वर्षीय महिलेला अटक करून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. दोघांनाही एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अरविंद यांना 7 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले होते. त्यावेळी पत्नीच्या प्रियकराने म्हणजेत आरोपी अमितने ते भरून आणले होते.
ती गोष्टी अरविंद यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी प्रियकर अरविंदच्या घरी पोहोचला. दोघांनी मिळून अरविंदचा खून केला. अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.