त्याच्यासाठी नवरा सोडला, ४ दिवसांत उतरले प्रेमाचे भूत, पुण्यातील विवाहितेसोबत भयंकर घडलं….

पुणे : प्रेमसंबंधांसाठी घरदार सोडून आलेल्या एका विवाहितेवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
तसेच आरोपी प्रियकराने तिला बेल्ट आणि लोखंडी कुलपाने मारहाण केली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ३० वर्षीय विवाहित महिला आणि आरोपी संदेश चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. प्रेमाखातर या महिलेने चार दिवसांपूर्वीच आपले घर सोडले आणि ती काळेवाडी येथील ज्योतिबानगर भागात संदेशसोबत राहण्यासाठी आली.

मात्र, काही दिवसातच संदेशचं खरं रूप समोर आले आहे. संदेश हा अविवाहित असून त्याला पैशांची लालसा होती. यासाठी त्याने पीडित महिलेकडे एक भलतीच मागणी लावून धरली.

तुझ्या सासूच्या नावावर असलेलं घर विक आणि त्यातून मिळणारे पैसे मला आणून दे, असा तगादा त्याने लावला होता. ही मागणी अत्यंत अवाजवी असल्याने विवाहितेने त्याला स्पष्टपणे नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये खटके उडू लागले.
दरम्यान, गुरुवारी (१८ डिसेंबर) रात्री १० वाजेच्या सुमारास या विषयावरून पुन्हा वाद झाला. संतापलेल्या संदेशने रागाच्या भरात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कमरेचा पट्टा काढून तिला बेदम मारले. एवढ्यावरच न थांबता, जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने घरातील मोठे लोखंडी कुलूप हातात घेतले आणि महिलेच्या डोक्यात ठिकठिकाणी वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
