जेजुरीत होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलले, कारण..
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे उद्या (ता .२३) होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केलेले नियोजन कोलमडत असून, ज्या नागरिकांना दाखले किंवा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, त्यांना आणखी काही काळ ताटकळत बसावे लागणार आहे.
आधी १ जुलै, १३ जुलै त्यानंतर २३ जुलै अशा तारखा ‘शासन दारी’ कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आल्या. त्यासाठी तयारीही सुरू होती. मात्र, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला, त्यामुळे पुन्हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, चौथ्यांदा कार्यक्रमाचा मुहूर्त चुकत आहे. प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तसेच जय्यत तयारी करण्यात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून, कोट्यवधी रुपयांचा खर्ची घातलेला निधीदेखील वाया जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांपासून आला प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांपासून इतर सर्व वरिष्ठ अधिकारी हे अहोरात्र नियोजनात व्यस्त होते. मात्र, कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला जात असल्याने अधिकाऱ्यांमधून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.