पुण्यात शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार; राष्ट्रवादीला रामराम करत प्रशांत जगताप करणार ‘या’ पक्षात प्रवेश…

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेसमोर पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे पुण्यात, विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद प्रचंड वाढणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढण्यासाठी जगताप यांचा जनसंपर्क फायदेशीर ठरू शकतो.

मात्र, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. जगताप यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमधील काही स्थानिक नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हा प्रवेश काँग्रेससाठी ‘फायदा’ ठरणार की ‘डोकेदुखी’, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, दुसरीकडे, प्रशांत जगताप यांनी साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पुण्यात पक्षाचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा आणि ताकदीचा असा दुसरा नेता सध्या तरी शरद पवार गटाकडे दिसत नाही. या फुटीचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे.
