मोठी बातमी! आता वळसे पाटील यांच्या टिकेला शरद पवारच देणार उत्तर! थेट त्यांच्या मतदार संघातच घेणार सभा
पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. सप्टेंबर महिन्यात शरद पवार आंबेगाव मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. वळसे पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील तिसरी सभा सप्टेंबर महिन्यात घेणार आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा या मतदारसंघात दरारा आहे. विशेष म्हणजे वळसे पाटलांचे समर्थक देवदत्त निकम आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी शरद पवारांची भेट घेत सभा घेण्याची विनंती केली आहे.
आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना त्यांना जनतेने एकदाही बहुमत देऊन मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.
त्यावरून पवार गट आक्रमक झाला आहे. अगोदर मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आता दिलीप वळसे पाटील यांच्यावर शरद पवार निशाणा साधणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॉवरफुल नेते अजित पवार हे महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.