शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, ११ जागांसाठी या दिवशी होणार मतदान…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह २६ नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उर्वरीत ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.

१० राज्यातील ३७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ७ राज्यांतील २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिहारमधील ५, ओडिशातील ४ आणि हरियाणातील २ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीमध्ये बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन हे राज्यसभेवर निवडून येण्याची शक्यता आहे. बिहारमधील ५ जागांसाठी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाचव्या जागेवर भाजचे शिवेश कुमार आणि राजदचे एडी सिंह यांच्यात लढत होणार आहे. तर उर्वरीत जागांवर कोणत्या नेत्याची निवड होतेय हे पाहणे महत्वाचे राहिल.

१० राज्यांमधील ३७ जागांसाठी एकूण ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील २६ नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नेत्यांमधअये विविध पदांचे उमेदवार आहेत. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी उमेदवार दिले नाहीत.
त्यामुळे हे नेते मतदानाशिवाय राज्यसभेत पोहचू शकले. अर्ज मागे घेतल्यानंतर बिहार, ओडिशा आणि हरियाणामधील ११ जागेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.
महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक झाली. या सातही जागांवरील सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीचे सहा आणि विरोधी महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा समावेश होता. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली.