Sharad Pawar : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मुस्लिम समाजाचा विरोध, समुदायाची शरद पवारांकडे मागणी…
Sharad Pawar : मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करावे, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती.
तथापि, या निर्णयावर आता नवा वाद उभा राहिला आहे. अहमदनगरमध्ये मुस्लीम समुदायाने ‘अहिल्यानगर’ या नावाला विरोध करत, ‘अहमदनगर’ हवे, अशी मागणी केली आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात जामखेड येथील मुस्लीम बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात ही मागणी केली.
यामुळे पुन्हा एकदा नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुस्लीम समाजाच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे, तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. Sharad Pawar
दरम्यान, अहमदनगर महापालिकेतही या नावाच्या बदलाबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही ‘अहिल्यानगर’ या नावास मान्यता दिली आहे, आणि या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. तथापि, मुस्लीम समुदायाच्या या विरोधामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.