Sharad Pawar : मोदींना देशाची घटना, संविधान बदलण्यासाठी चारशेचा आकडा हवाय! शरद पवार यांचे ‘उरुळीकांचन’ भाजपवर संरसंधान..!!
जयदीप जाधव
Sharad Pawar उरुळीकांचन : भाजपला संसदीय लोकशाही मान्य नाही. या पक्षाशी संबंधित खासदार भाजपला संसदीय पद्धत रद्द करण्याची भाषा बोलत आहे. त्यासाठी भाजपला ४०० संख्याबळ आवश्यक आहे. हे संख्याबळ मिळाले तर मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घालून दिलेली घटना व संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ उरुळीकांचन येथे रविवार ( दि.२८)येथे सायंकाळी आयोजित विराट जाहिर सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, मोदींनी देशात कुठलाच घटक खूश ठेवला नाही. नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांतील कामगिरीवर जनतेत समाधान नाही. देशातील शेतकऱ्यांची आवस्था चिंताजनक आहे. या अवस्थेवर मोदी सरकार चर्चा करायला तयार नाही. पंजाब , हरियाणा, राजस्थान राज्यांतील शेतकरी हे प्रश्न घेऊन दिल्लीत धडक घेत आहेत.
मात्र या आंदोलनाचा अटकाव केला जात आहे. अनेक महिने हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सिमेवर धडका देत आहे. मात्र केंद्र सरकारला फिकीर नसून त्यांना रस्त्यावर आडवले जात आहे. त्यांच्याशी चर्चा , विचारविनिमय करायला सरकार तयार नाही. केंद्र सरकारने साखर च्या प्रश्नाकडे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांची काय आवस्था आहे. Sharad Pawar
आमच्या १० वर्षाच्या काळात शेतीप्रधान देशात गव्हाची उपलब्धता नसल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही एक महिन्यात देशात गव्हाची उपलब्धता करणारे दुसऱ्या नंबरचे राष्ट्र म्हणून केले. तांदळाची उपलब्धता दुसऱ्या क्रमांकांची केली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या घामाला दाम, शेतीचे संशोधन करुन कमी खर्चात औषधे, बियाणे, वाण व कमी बोजाचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही लक्ष पुरविले.
एका शेतकऱ्याने यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केली. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व आम्ही शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बॅक, नाबार्ड यांच्याशी चर्चा करुन ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली.
द्राक्ष, आंबा,सफरचंद, मोसंबी आदी फळबागांची उत्पादकता वाढवली. जी फळे फक्त उपचारासाठी दवाखान्यात दाखल झालेल्या रूग्णांना मिळत असे ती आम्ही सार्वजनिक विक्रीसाठी उपलब्ध होईल इतक्या प्रमाणात उत्पन्नात आणली. परंतु ती परिस्थिती आता दिसत नाही.
शरद पवार ते पुढे म्हणाले, मोदी सरकार विरुद्ध बोलणाऱ्या छत्तीसगड, दिल्ली सरकारमधील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डामण्यात आले आहे. देश हुकुमशाहीकडे चालला असून मनमोहन सिंग यांनी १०वर्षात पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांनी देशाची परिस्थिती वेळोवेळी मांडली. मात्र आता पत्रकार परिषद दिसत नाही. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नसल्याने त्यांनी जनतेच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम केले असून अशा लोकांना हद्दपार करा असे आवाहन पवार यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या ३५ जागा निवडून येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आमचे पूर्वीचे सहकारी पक्ष सोडून गेल्याने देशातील आमचा पक्ष स्वच्छतेत एक नंबरचा ठरला आहे. शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांचा पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष फोडण्याचे कारस्थाना जनता उत्तर देणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
प्रचारसभेत उमेदवार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, विकास लवांडे, सक्षना सलगर, देविदास भन्साळी, प्रा.के.डी. कांचन यांची भाषणे झाली. तर सभेसाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माधव काळभोर, प्रकाश म्हस्के, राजेंद्र ज्ञानोबा कांचन, राजाराम कांचन , योगिनी कांचन, सरपंच भाऊसाहेब कांचन आदी उपस्थित होते. सभेसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.