देशातील विरोधी गटात मोठी फूट.? आता शरद पवार यांचा बंगळुरमधील विरोधकांच्या बैठकीत सहभाग नाही…
मुंबई : आजपासून ( विरोधी पक्षांच्या बंगळूर येथील संयुक्त बैठकीला सुरुवात होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत सहभागी होणार नाहीत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रवक्त्याने या वृत्ताची पुष्टी केली आहे. तसेच संदर्भाचे ट्विट एएनआयने केले आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्याच्या हेतूने चर्चा करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक सोमवारी बंगळूर येथे होणार असून बैठकीला २४ पक्ष उपस्थित राहतील, असा विश्वास विरोधकांच्या गोटातून व्यक्त करण्यात आला आहे.
ही बैठक दोन दिवस चालणार आहे. यापूर्वी २३ जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली संयुक्त बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आयोजित केली होती.
आता बंगळूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणारी ही दुसरी बैठक अधिक व्यापक स्वरूपाची असेल, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी दिली होती.
बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
या दिग्गज नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आधी आपण या बैठकीस हजर राहणार असल्याचे सांगितले होते. पण आज ते या बैठकीत सहभागी होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला सहभाग आधीच निश्चित केला आहे.
आम आदमी पक्ष या बैठकीत भाग घेणार काय, याबद्दल अनिश्चितता होती. तथापि, त्या पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी आपला पक्ष बैठकीत भाग घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
द्रमुकचे प्रमुख तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार आणि अन्य विरोधी नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नवे नाव निश्चित केले जाऊ शकते.