एकीकडे चर्चा दुसरीकडे लाठीचार्ज, बळाचा वापर करण्याची गरज काय.? शरद पवार मुख्यमंत्र्यांवर बरसले…

जालना : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथे चार दिवसांपासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी जोरदार लाठीमार झाला. यामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून याचे ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली. तर दुसरीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांनी आज शनिवार (ता.२) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी शरद पवार म्हणाले, मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द न पाळल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले. एकीकडे चर्चा केली, तर दुसरीकडे लाठीचार्ज केला. आंदोलकांना पागविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक आणण्यात आली होती. अंतरवाली सराटी गावात घडलेले घटना दुर्दैवी आहे, असे पवार म्हणाले.
सरकारने फक्त अश्वासन दिले पण त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला. ते म्हणाले, यापूर्वीही मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलने केली, मात्र असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द पळला नसल्यानेच आंदोलन करण्यात आले.
या आंदोलकांवर पोलिसांकडून जोरदार लाठीहल्ला केला. एवढेच नाहीतर हवेत गोळीबारही करण्यात आला. एका बाजूला चर्चा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला करायचा. आंदोलन दाबण्यासाठी सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात पवारांनी केला आहे.