‘आई राजा उदो उदो ‘च्या जयघोषात कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ

तुळजापूर :महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. नवरात्र उत्सव काळात देशभरातील भाविक आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. ‘आई राजा उदो उदो ‘च्या जयघोषात कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा पहाटे संपुष्टात येऊन देवीचे मुख्य मूर्ती सिंहासनाधीष्टीत करण्यात येऊन मातेला पंचामृत अभिषेक सुरू केले जाणार आहे. देवीची त्रिकाल पूजा पार पडणार आहे. पहाटे स्थापित मूर्तीला चरणतीर्थ आटोपून अभिषेक पार पडल्यानंतर देवीच्या नित्य पूजेची घाट सकाळी होऊन पुन्हा नियमित पंचामृत अभिषेक सुरू होणार आहे.

दरम्यान आज तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापनेने नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ही नित्य पूजेची घाट होऊन अभिषेक घालण्यात येणार आहे. आज देवीची नित्योपचार, पूजा, वस्त्रलंकार, नैवेद्य, धुपारती अंगारा पार पडल्यानंतर मंदिरातील गणेश विहार ओवरीत देवीच्या प्रतिमेची विधीवत स्थापना करून यजमानांकडून त्या ठिकाणी घटस्थापना करण्यात येणार आहे.

यंदा नवीन वर्षाच्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल एक आठवडाभर शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तुळजापुरात आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो च्या जय घोषात आसमंतात घुमणार आहे. या नवरात्र उत्सवात मंदिर संस्थांनी मंदिरात जाण्या येण्याचे मार्ग बदलले आहेत. मातेचे मुख्य महाद्वार केवळ बाहेर पडण्यासाठी उघडे ठेवले जाणार आहे.
