पाबळ घरफोडीत लोणीकाळभोर च्या चोरट्यांचा सहभाग, शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ..!!
शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील माळवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील संसारपयोगी साहित्यांची चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत एकाला अटक केली आहे.
याबाबत सत्यभामा किसन पिंगळे (वय ६५ रा. वरचामळा माळवाडी पाबळ ता.शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी बायडाबाई तात्या शिंदे, लक्ष्मी शांताराम शिंदे व संतोष विलास चौधरी (तिघे रा. रायवाडी लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाबळ येथे सत्यभामा पिंगळे यांचे घर असून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्याने त्यांनी सत्यभामा यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेच घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये दोन महिला व एक इसम घरातील साहित्य पोत्यांमध्ये भरत असल्याचे दिसले.
पिंगळे यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडले. दरम्यान, पोलीस पाटील यांनी पोलिसांना बोलावून घेत त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीकडील एम एच ०९ सी यु ७९२८ हे वाहन जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहेत.