लग्नाच्या वचनाने केला घात!! ‘जीवनसाथी’वर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैगिक अत्याचार..

पुणे : लग्नाचे वचन देत तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणाने दुसऱ्याच महिलेशी लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हिंजवडी व वाशी परिसरात १४ ऑक्टोबर २०२१ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (ता. २३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अविनाश शिवाजी पाटील (वय ३१, रा. कोल्हापूर) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची जीवनसाथी या मेट्रोमोनीअल वेबसाइटवर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीला भेटायला बोलावले. जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.

लग्नाचे वचन देत वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर जुलै २०२३ मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्न करत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीने जाब विचारला असता तुला काय करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ केली.
त्यानंतर महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.