लैंगिक शोषण अन् मुलींचा आवाज, प्रकरण उघड पडण्याच्या भीतीने २ बहिणींना ड्रममध्ये बुडवून मारलं; पुण्यातील भयंकर प्रकार…

राजगुरुनगर : पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. 54 वर्षीय अजय चंद्रमोहन दास या आरोपीने लैंगिक शोषण उघड होण्याच्या भीतीने दोन्ही बहिणींना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून निर्घृण हत्या केली.

घटनेनंतर आरोपीने परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. अजय दासवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात या खटल्याची सुनावणी होईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सातकरस्थळ ग्रामपंचायतीने पीडित कुटुंबाला घर, नोकरी, आणि मुलांच्या शिक्षणासाठी पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस तपासाचा आढावा घेतला आणि पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. त्यांनी राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. यावेळी संतप्त नागरिक उपस्थित होते.
मुलींच्या सुरक्षेसाठी परप्रांतीय भाडेकरूंच्या नोंदी ठेवणे आणि त्यांची पार्श्वभूमी तपासणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. न्यायव्यवस्थेत सुधारणा आवश्यक गोऱ्हेंनी फास्ट ट्रॅक कोर्टातील खटल्यांना जलदगतीने निकाली लावण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या क्रूर घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजातून होत आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पोलीस तपास सुरू आहे.