सांगलीत सात महिन्यांच्या गर्भवतीने आयुष्य संपवलं, पती, सासू-सासऱ्याला अटक, नेमकं प्रकरण काय?


सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक देखील केली आहे. . ऋतुजा सुकुमार राजगे (वय.२७) असं या विवाहित तरुणीचं नाव असल्याची माहिती आहे. ६ जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेत आपल्या आयुष्याची दोर कायमची कापली. यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती.

दरम्यान, सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.

सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती, या छळाला कंटाळूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या घटनेने ऋतुजाच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तर, एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याने सांगलीत एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!