एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सात लाख विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी….!
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या अभियांत्रिकी , वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीला यंदा विक्रमी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
एमएचटी सीईटीला यंदा 7 लाख 38 हजार 972 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली असल्याने आणखी संख्या वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षण विभागांच्या अंतर्गत येणार्या विविध विषयांच्या 18 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. यामध्ये एमएचटी सीईटीसाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी नोंदणी करत असतात.
एमएचटी सीईटी-पीसीएम ग्रुपची परीक्षा 9 मे रोजी सुरू होणार आहे, तर ती परीक्षा 13 मे रोजी संपणार आहे, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 15 मेपासून सुरू होईल. ही परीक्षा 20 मे रोजी संपणार आहे. या कालावधीत परीक्षा विविध सत्रात पार पडणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करण्यात येणार आहेत.