‘सात पिढ्यांना लक्षात राहील…’;पुण्यात आयुक्तांच्या धमकीनंतरही गुन्हेगारीच्या घटना, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गुंडांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरच शहरातील गुन्हेगारांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सात पिढ्यांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवू.’ अशी धमकी दिली होती. मात्र या धमकीनंतर ही गेल्या दीड वर्षात पुण्यात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या असून त्यातील 35 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. वर्षभरात ८९ प्रकरणे नोंद झाली असून, चालू वर्षातही ३५ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.

पुण्यातील विविध भागांमध्ये गुन्हेगारीच्या घटना इतक्या वाढल्या आहेत की, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग आणि कोयता गँगसारख्या टोळ्यांची वाढती दहशत हे सर्वात चिंताजनक आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये सलग रात्रींमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, हडपसर, भवानी पेठ, धनकवडी, कात्रज या परिसरांमध्ये दररोज नवे गुन्हे घडताना दिसत आहेत. काही घटनांमध्ये थेट हवेत गोळीबार झाला, कोयत्याने वार करण्यात आले आणि तलवारी घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी काही प्रमाणात अटक व कारवाई केली असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि ठोस नियंत्रण यंत्रणेअभावी या घटनांना रोखता येत नाही. परिणामी, ‘पुणेकर भयमुक्त कधी होणार?’ हा सवाल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
