मुंबई -गोवा महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; 22 जण जखमी…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई -गोवा महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत अशातच आता या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावनजीक पुण्याहून खेडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की,या अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेट्स नं पडल्याने बस बॅरिकेट्सला जोरदार धडकली. व सुमारे 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत जखमींना वर काढले आहे. पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकाने ही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. दरम्यान जखमींवर खेड तालुक्यातील कळंबनी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहेत. धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेटिंग यामुळे हा गंभीर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

