विजेचा शॉक लागून लोणी काळभोर येथील वरिष्ठ तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू, घटनेने सगळेच हळहळले…

लोणी काळभोर : येथील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी महावितरण विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, विद्युत प्रवाहाला चिटकून वरिष्ठ तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. प्रज्ञापाल सोनसळे हे महावितरणच्या लोणी काळभोर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम पाहत होते. सोनसळे आज दुपारच्या सुमारास रायवाडी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत होते. यावेळी ही घटना घडली आहे.
काम करत असताना त्यांना अचानक विजेचा शॉक बसला आणि ते जमिनीवर पडले. त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता सोनसळे यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे लोणी काळभोर सह परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत नेमकं काय घडलं याचा तपास सध्या केला जात आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ प्रज्ञापाल प्रकाशराव सोनसळे (वय 45, रा. लोणी काळभोर, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.