लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं निधन, ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराने झाले होते सन्मानित..

पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने केवळ पोलीस दलातच नव्हे तर संपूर्ण हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात आपली ड्युटी चोख पार पाडून वडगावशेरी येथील घरी परतले होते. मात्र, मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार अत्यंत शांत, संयमी आणि हसतमुख अधिकारी आणि कर्तव्यदक्ष मानले जाणारे अधिकारी होते.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे नियोजन त्यांनी सलग दोन वर्षे अतिशय सुरक्षितपणे हाताळले होते.

पुणे शहर आयुक्तालय अंतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र अत्यंत आव्हानात्मक होते मात्र सर्जेराव कुंभार यांनी केवळ गुन्हेगारीतच नाही तर पोलीस ठाण्याच्या कामकाजात ही मोठे सकारात्मक बदल घडवून आणले.
नुकतेच २५ ते २७ जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता. योगायोगाने याच काळात वाघोलीत दोन खुनाच्या घटना घडल्या, मात्र दबावाखाली न येता कुंभार यांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखली. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५ मध्ये त्यांना ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
कुंभार यांच्या जाण्याने पोलीस दलासह सर्वसामान्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी सध्या शिक्षण घेत आहेत. सिद्धी ही बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत असून वडिलांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते