ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन; कर्करोगाच्या दुर्धर आजाराची झुंझ अखेर अपयशी…

पुणे: पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय ६३ वर्ष ) यांचे सोमवारी (दि.१३ एप्रिल) दुपारी पुणे येथे उपचार चालू असतानाच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुरंदर तालुक्यातील कोथळे या त्यांच्या मूळगावी कऱ्हा नदीच्या काठावर सोमवारी रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. प्रकाश भोईटे यांनी दैनिक पुढारी, देशदूत, ऐक्य, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले आणि संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती.
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबरही भोईटे यांनी काही काळ काम केले. शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांनी वेळोवेळी सहभाग घेतला होता. दि पूना मर्चन्टस चेबरतर्फे दिला जाणारा कै. वी. ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय शाळा मूल्यांकन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी त्यांनी लढा दिला होता. राजकीय विषयावरील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता.त्यांच्या अनेक बातम्या राज्यभर गाजल्या. कृषी सहकार, साखर विषयावरही त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली.

पुरंदर तालुक्यातील कोथळे गावच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अनेक कोथळे गावात लोकाभिमुख कामे केली. त्यांनी कोथळे येथील वाचनालयाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. त्यांच्या पत्नी जयश्री भोईटे या कोथळे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष ॲड. धनंजय भोईटे, कोथळे ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्तात्रेय भोईटे आणि पत्रकार प्रताप भोईटे हे त्यांचे बंधू होत.