पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १६ लाखाचा गंडा ; सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी नागरिकांची फसवणुक सातत्याने करत असल्याचे समोर येत आहे. अशातच आता पुण्यातील एका कॉलनीतील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची ‘तुमचे पेन्शन सर्टिफिकेट तयार करत आहोत,’ अशी बतावणी करून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १६ लाख ५ हजार रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेऊन फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत खातं आहे. २ नोव्हेंबर रोजी सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवून, ज्येष्ठ नागरिकाला ‘पेन्शन सर्टिफिकेट’ देण्याचे आमिष दाखवले.चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून घेतले आणि त्यांच्या बँक खात्याशी संबंधित सर्व गोपनीय माहिती काढून घेतली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्यांनी काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख ५ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वळते केले.आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही सायबर चोरट्यांनी ‘पेन्शन सर्टिफिकेट’च्या बहाण्याने कोंढव्यातील एका महिलेला फसविले होते. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

